आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-“राज्याच्या शिक्षण संघटनेची धुरा आता वाईच्या खांद्यावर! प्रा. डॉ. नितीन कदम सरचिटणीस; राज्यभरातून विश्वासाची मोहर”

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-“राज्याच्या शिक्षण संघटनेची धुरा आता वाईच्या खांद्यावर! प्रा. डॉ. नितीन कदम सरचिटणीस; राज्यभरातून विश्वासाची मोहर”

दिशा अकॅडमीच्या कार्याची राज्यस्तरावर दखल; कोचिंग क्लासेस क्षेत्राला मिळाले वाईचे दमदार नेतृत्व
वाई | प्रतिनिधी
वाई, दि. १ : वाईच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या घडामोडीत दिशा अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. नितीन कदम यांची प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्यच्या राज्य सरचिटणीसपदी बहुमताने निवड झाली आहे. महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांतील प्रतिनिधींनी त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत राज्यातील कोचिंग क्लासेस क्षेत्राची महत्त्वाची धुरा त्यांच्या हाती सोपवली आहे.
गेली अनेक वर्षे गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध अध्यापन आणि सातत्यपूर्ण निकालांच्या बळावर दिशा अकॅडमीने राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रा. डॉ. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज देश-विदेशातील नामांकित संस्थांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची हीच राज्यस्तरीय पावती मानली जात आहे.
संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने कोचिंग क्लासेस क्षेत्रातील प्रश्न शासनापुढे मांडले. त्यांच्या संघटन कौशल्याचा आणि प्रदीर्घ अनुभवाचा गौरव म्हणून त्यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आता राज्यभरातील हजारो क्लास संचालकांचे प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी ते पार पाडणार आहेत.
राज्याध्यक्षपदी डॉ. प्रशांत गणेश (पी.) कुलकर्णी यांची निवड झाली असून, नवीन कार्यकारिणीने बेकायदेशीर स्पर्धा, डिजिटल आणि कॉर्पोरेट शिक्ष संस्थांचे वाढते आव्हान तसेच कोचिंग क्लासेस क्षेत्राला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रा. डॉ. नितीन कदम यांच्या या राज्यस्तरीय निवडीमुळे वाईच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान पुन्हा एकदा महाराष्ट्रभर उंचावला असून, विविध शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

2) वाई:-डेअरी माफियांना मोठा दणका!

वाईत अन्न-औषध प्रशासनाचा धडक छापा; ६ वाहनांवर कारवाई, १२ दुधाचे नमुने तपासणीसाठी जप्त!

विनाचाचणी दूध थेट डेअरीत; संबंधित डेअरींवरही कारवाईचे संकेत, दूध व्यवसायातील गंभीर अनियमितता उघड.

वाई | प्रतिनिधी
वाई, दि. १ : वाई तालुक्यातील धोम धरण परिसरात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धडक छाप्यात दूध व्यवसायातील गंभीर अनियमितता उघडकीस आली. परवान्याशिवाय दूध संकलन व वाहतूक करणारी तब्बल ६ वाहने पकडण्यात आली असून, त्यातील १२ दुधाचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

तपासणीदरम्यान वाहनचालकांकडे दूध संकलन व वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे, दुधाची गुणवत्ता किंवा भेसळ तपासणी न करताच ते थेट विविध डेअरींकडे पाठविले जात असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या दूध पुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले की, ज्या डेअरींकडे हे दूध पुरवले जात होते, त्या डेअरींचीही चौकशी करण्यात येणार असून, नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

कारवाईदरम्यान नामदेव नवघने, आत्माराम चिकणे, प्रकाश गावडे, अजित चोरट, ओंकार सणस आणि प्रदीप जाधव यांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात गायीचे व म्हशीचे दूध आढळून आले. प्रत्येक वाहनातून दोन नमुने घेऊन एकूण १२ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

“दुधाची कोणतीही प्रयोगशाळा चाचणी न करता ते नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असेल, तर उद्या कोणाच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी किरकोळ व्यावसायिकांवर कारवाई करणाऱ्या प्रशासनाने आता दूध व्यवसायातील बेकायदेशीर साखळीवर धडक कारवाई केल्याने, केवळ वाहनचालकांवरच नव्हे तर संबंधित डेअरी आणि या साखळीतील इतर जबाबदार घटकांवरही कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

3) वाई:-“ॲसिड टाकलं… तरी हरला नाही!” वटपौर्णिमेला खानापूरच्या ऐतिहासिक पिंपळाला नवजीवन; युवकांच्या जिद्दीपुढे समाजकंटकांचा पराभव.

वाई, दि. १ : विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल होत असताना, वाई तालुक्यातील खानापूर गावाने पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. गावातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या पवित्र पिंपळ वृक्षावर काही समाजकंटकांनी ॲसिड टाकून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, निसर्गाची जिद्द आणि गावातील युवकांच्या अथक प्रयत्नांमुळे हा पिंपळ पुन्हा उभारी घेत वटपौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर नव्या जागी यशस्वीपणे पुनर्रोपित करण्यात आला.
हा पिंपळ अनेक संकटांचा साक्षीदार ठरला आहे. यापूर्वीही त्याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले, फांद्या तोडण्यात आल्या; तरीही प्रत्येक वेळी त्याने नव्या पालवीसह जगण्याचा संदेश दिला. काही दिवसांपूर्वी विकृत प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी त्याच्या मुळांवर ॲसिड टाकल्याने वृक्ष सुकू लागला आणि गावकऱ्यांची चिंता वाढली. मात्र, “निसर्गाला संपवणं इतकं सोपं नसतं,” हे खानापूरकरांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं.
गावातील युवक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने एकत्र येत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या पिंपळावर उपचार केले. वटपौर्णिमेच्या शुभदिनी विधिवत पुनर्रोपण करून त्याला नवजीवन देण्यात आले. ज्या दिवशी महिला वडाची पूजा करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात, त्याच दिवशी पिंपळाचे पुनर्रोपण करून खानापूरच्या युवकांनी पर्यावरण रक्षणाचा खरा संदेश दिला.
पुनर्रोपणानंतर ग्रामस्थांनी सर्वांना भावनिक आवाहन केले आहे. “हा पिंपळ केवळ एक वृक्ष नाही; तो आमच्या गावाचा इतिहास, श्रद्धा आणि पुढील पिढ्यांचा श्वास आहे. त्याचे संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यापूर्वीही खानापूरमध्ये हायस्कूल परिसरात वड, पिंपळ, लिंब, अर्जुन, मोह आणि जांभूळ यांसारख्या विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धनाचा हा वारसा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
खानापूरच्या या उपक्रमाचे वाई तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात कौतुक होत असून, “वृक्ष वाचवा, भविष्य वाचवा” हा संदेश या कृतीतून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला आहे.
ग्रामस्थांची भावना :
“हा पिंपळ आमच्या गावाची ओळख, पूर्वजांच्या आठवणी आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. आम्ही वृक्षसंवर्धनाचा हा वारसा पुढील पिढीपर्यंत नक्की पोहोचवू.”

4) वाई:-बोरगावच्या खेळाडूंची राज्यात दमदार गरुडझेप! ‘न्यू इंग्लिश स्कूल’चा पदकांचा पाऊस; यशदा वाडकर ‘वर्षातील सर्वोत्तम खेळाडू’

सातारा | वाई, दि. १ :
वाई तालुक्यातील बोरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलने राज्यस्तरीय सीनियर जंप रोप स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत तालुक्याचा मान उंचावला आहे. नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत विद्यालयाच्या मुलांच्या संघाने कांस्यपदक पटकावत सांघिक ताकद दाखवली, तर अष्टपैलू खेळाडू यशदा मेघा वाडकर हिने दोन रौप्यपदके जिंकत ‘वर्षातील सर्वोत्तम खेळाडू’ हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सन्मानही आपल्या नावावर केला.
नाशिकच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये २८ व २९ जून रोजी झालेल्या स्पर्धेतील ३० सेकंद स्पीड रिले प्रकारात श्रवण वाडकर, यश मालुसरे, ऋषभ मांढरे, अनुज महांगडे आणि ऋतिक मांढरे या खेळाडूंनी शानदार सांघिक खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदकाची कमाई केली.
याच स्पर्धेत नववीतील यशदा मेघा वाडकर हिने ३० सेकंद स्पीड आणि फ्री स्टाईल या दोन्ही वैयक्तिक प्रकारांत रौप्यपदके पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य जंप रोप संघटनेने तिला ‘वर्षातील सर्वोत्तम खेळाडू’ तसेच ‘राष्ट्रीय पदक विजेती’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सन्मान शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते अशोक दुधारे यांच्या हस्ते करण्यात आला. या यशामागे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व जंप रोप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अजित वाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नारायणराव वाडकर, उपाध्यक्ष नारायण वाडकर, सचिव मधुकर वाडकर, माजी अध्यक्ष लक्ष्मणराव वाडकर, मुख्याध्यापक संतोष वाडकर, संचालक मंडळ, शिक्षक, पालक तसेच सातारा जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी संगिता जगताप आणि जंप रोप असोसिएशनचे जिल्हा सचिव नितीन सुरवसे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

5) वाई:-धोम धरणग्रस्तांच्या न्यायलढ्याला मोठं यश! मंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकाराने २९ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा.

दशकांपासून प्रलंबित पुनर्वसन नागरी सुविधांच्या प्रस्तावाला गती; हजारो धरणग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा.

सातारा | वाई, दि. १ :
धोम धरणाच्या बॅकवॉटर भागात वर सरकून वसलेल्या २९ गावांतील हजारो धरणग्रस्त नागरिकांच्या अनेक दशकांपासून रखडलेल्या पुनर्वसनाच्या नागरी सुविधांचा प्रश्न अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकारानंतर ३० जून २०२६ रोजी शासनाने विभागीय आयुक्त, पुणे आणि जिल्हाधिकारी, सातारा यांना या गावांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
धोम धरणाचे काम पुनर्वसन कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी सुरू झाल्यामुळे अनेक कुटुंबांनी स्थलांतर न करता मूळ परिसरातच वर सरकून नवीन गावठाणे वसवली होती. मात्र कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींमुळे ही गावे अनेक वर्षे रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली.
आता सन १९७६ पूर्वीच्या कोयना, धोम, वीर, कण्हेर आणि येरळवाडी पुनर्वसन वसाहतींना ज्या धर्तीवर सुविधा देण्यात आल्या, त्याच धर्तीवर या २९ गावांनाही सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
या प्रश्नासाठी माजी सभापती चंद्रकांत धोंडीबा शेलार, संतोष राजाराम कोंढाळकर, सुरेश बबन सणस आणि पंकज आनंदा वाडकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळाल्याची भावना धरणग्रस्तांनी व्यक्त केली आहे.
या निर्णयामुळे धोम, वेलंग, आसरे, पानस, रेणावळे, खावली, वडवली, वाशिवली, कोंढावळे, वासोळे, भिवडी, गोवे, आसगाव, कोंढवली, परतवडी, बलकवडी, वयगाव, दह्याट, बोरगाव खुर्द, धावली, मालतपूर, मुगाव, न्हाळेवाडी, बोरिव, व्याहळी, दसवडी, चिखली मोरजीवाडा, आकोशी, नांदगणे आणि बोरगाव बुद्रुक या गावांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
शासनाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या गावांमध्ये पक्के रस्ते, सुरक्षित पिण्याचे पाणी, वीज, शाळा, आरोग्य सुविधा, समाजमंदिर, स्मशानभूमी, अंतर्गत रस्ते आणि गटारे यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असून, अनेक दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या धोम धरणग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

6)वाई:-“वीरमातेच्या हस्ते ‘शिवसह्याद्री अभ्यासिके’चे उद्घाटन; स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे अभ्यासकेंद्र!”

७५० हून अधिक युवकांना सरकारी सेवेत संधी देणाऱ्या शिवसह्याद्री करिअर अकादमीचा आणखी एक प्रेरणादायी उपक्रम.

वाई, दि. ०१ : स्पर्धा परीक्षा, सैन्य, पोलीस व इतर शासकीय सेवांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाई शहरात सुसज्ज आणि आधुनिक ‘शिवसह्याद्री अभ्यासिके’चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान सूरज मोहिते यांच्या मातोश्रींच्या शुभहस्ते उद्घाटन झाल्याने या सोहळ्याला देशभक्तीची आणि प्रेरणेची अनोखी किनार लाभली.
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शांत, दर्जेदार आणि सर्व सुविधांनी युक्त अभ्यासाचे वातावरण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राजेंद्र खरात आणि प्रशांत डोंगरे यांनी संयुक्तपणे या अभ्यासिकेची उभारणी केली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना योग्य दिशा मिळावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत यश मिळवावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
उद्घाटनप्रसंगी नगरसेवक अजित शिंदे, नगरसेवक सुशील खरात, बापूराव खरात, फौजी सौरभ गायकवाड, माजी सैनिक शिवाजी घाडगे यांच्यासह पालक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले.
शिवसह्याद्री करिअर अकादमीने आजवर ७५० हून अधिक युवकांना भारतीय सैन्य, पोलीस दल तसेच विविध सरकारी आणि निमसरकारी सेवांमध्ये यशस्वीपणे रुजू करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक युवकांचे करिअर घडण्यास मोठी मदत झाली आहे.
केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता, वनवे विझविणे, पूरग्रस्तांना मदत करणे, आपत्तीच्या काळात बचावकार्य आणि गरजूंना सहाय्य अशा विविध सामाजिक उपक्रमांतही अकादमीने सातत्याने सहभाग घेत समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे.
यामुळे नव्याने सुरू झालेली शिवसह्याद्री अभ्यासिका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी केंद्र ठरणार असून, येथून भविष्यात अनेक अधिकारी, सैनिक आणि पोलीस कर्मचारी घडतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

7) शिरवळ:-“ड्रग्जच्या काळ्या धंद्यावर शिरवळ पोलिसांचा बुलडोझर! एम.डी. विकणारा आरोपी जेरबंद; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त”

सातारा | शिरवळ, दि. ०१ :
पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील लोणंद फाट्याजवळ शिरवळ पोलिसांनी धडक कारवाई करत एम.डी. (मेफेड्रॉन) या घातक अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका आरोपीला रंगेहात अटक केली. या कारवाईत तब्बल २ लाख ६० हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ड्रग्ज तस्करीविरोधात शिरवळ पोलिसांनी मोठा दणका दिला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे २८ जून २०२६ रोजी शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथील हायवे सर्व्हिस रोडवर पोलिसांनी सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून ३९ हजार रुपयांचे एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्ज, २ लाख रुपयांची बुलेट मोटारसायकल, २० हजार ५०० रुपयांचा मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, तसेच १ हजार २० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या मुख्य आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या मुख्य रॅकेटचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिर तसेच पोलीस अंमलदार विलास यादव, नितीन नलवडे, सचिन वीर, गिरीश भोईटे, संजय केंगले, अजित बोराटे, सुरज चव्हाण, अरविंद बारहाळे, भाऊसाहेब दिघे, तेजस तरडे, अक्षय बगाडे आणि होमगार्ड संतोष इंगवले यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

8) वाई:-“वाईत शरद पवार गटात ‘पाकीट विरुद्ध निष्ठा’ संघर्ष! तडजोडीच्या राजकारणावर निष्ठावंतांचा बंडाचा इशारा”

पक्षासाठी चपला झिजवणारे डावलले; ‘सेटलमेंट बहाद्दर’ पदांवर? वरिष्ठांकडे थेट दाद, अन्यथा पक्षातून दुरावण्याचा इशारा.

सातारा | वाई, दि. १ :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वाई विधानसभा मतदारसंघात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर पक्षातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे. पक्षाच्या कठीण काळात खांद्याला खांदा लावून उभे राहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आर्थिक तडजोड करणाऱ्या आणि विरोधकांशी जवळीक असलेल्या व्यक्तींना पदे दिल्याचा गंभीर आरोप होत असून, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, पक्षाशी सातत्याने प्रामाणिक राहणाऱ्यांना दूर ठेवून ‘पाकिटावरचे’ आणि ‘सेटलमेंट बहाद्दर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींना महत्त्व दिले जात आहे. पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांनी पक्षवाढीसाठी नेमके कोणते योगदान दिले, याचा जाहीर हिशेब द्यावा, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे.
कार्यकर्त्यांनी काही पदाधिकाऱ्यांवर विरोधी गटांच्या व्यासपीठावर जाऊन सत्कार स्वीकारल्याचा आरोप करत, अशा प्रवृत्तीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचे म्हटले आहे. पडत्या काळात निष्ठेने पक्षासाठी झटणाऱ्यांना बाजूला सारून तडजोडीच्या राजकारणाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर संतप्त कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे थेट दाद मागितली असून, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निष्ठावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा पक्षाशी जीवापाड निष्ठा असलेला सामान्य कार्यकर्ता दुरावण्याची वेळ येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे वाई विधानसभा मतदारसंघात पक्षांतर्गत नाराजी आणखी वाढण्याची चिन्हे दिसत असून, या वादावर पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button