आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

कराड:-कृषी दिनी सह्याद्रि कृषी महाविद्यालयात हरित संकल्प! वृक्षारोपणासह नव्या रोपवाटिकेचे उद्घाटन.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) कराड:-कृषी दिनी सह्याद्रि कृषी महाविद्यालयात हरित संकल्प! वृक्षारोपणासह नव्या रोपवाटिकेचे उद्घाटन.

कराड दी.१: महाराष्ट्र कृषी दिन तसेच सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. पी. डी. पाटील आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्रि कृषी महाविद्यालयाच्या वतीने बुधवार, दि. १ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्व. पी. डी. पाटील आणि स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने होणार आहे. यावेळी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानंतर दुपारी ४ वाजता सह्याद्रि कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर वृक्षारोपण कार्यक्रम तसेच महाविद्यालयाने नव्याने विकसित केलेल्या रोपवाटिकेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी सहकार मंत्री तथा सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील राहणार असून, व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील, संचालक मंडळातील सदस्य तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधत पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि कृषी क्षेत्रातील नव्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक, ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सह्याद्रि कृषी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

2) कराडमध्ये मनसेची ‘पॉवर एन्ट्री’! शाखा उद्घाटन, कार्यकर्त्यांचा जल्लोष; निवडणुकांपूर्वी संघटन बळकटीचा बिगुल
सातारा |
कराड दी.१:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कराडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत संघटन विस्ताराचा श्रीगणेशा केला. मनसेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख ॲड. गणेश सातपुते आणि पक्ष नेते रणजीत शिरोळे यांच्या झंझावाती कराड दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, शहरात मनसेच्या नव्या शाखांचे उद्घाटन करून पक्षाने संघटन बळकट करण्याचा स्पष्ट संदेश दिला.
दौऱ्याची सुरुवात दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादनाने झाली. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम येथील समाधीस्थळी आदरांजली वाहण्यात आली.
यानंतर कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. या बैठकीत संघटन वाढ, आगामी निवडणुकांची तयारी आणि जनसंपर्क वाढविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
दौऱ्यात कराड शहरातील मनसेच्या विविध नव्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या शाखांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवले जातील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष ॲड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, शहराध्यक्ष सागर बर्गे, तालुकाध्यक्ष सतीश यादव, पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर, कराड उत्तर तालुकाध्यक्ष रणजीत कदम यांच्यासह विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले आणि पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व हजारो मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रणजीत शिरोळे यांचे आवाहन :
“स्थानिक प्रश्नांवर आक्रमकपणे लढा उभारा. आगामी काळात प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन वाढीसाठी कंबर कसावी,” असे आवाहन त्यांनी केले.
ॲड. गणेश सातपुते यांचा गुरुमंत्र :
“जनतेमध्ये जाऊन काम करा, तळागाळातील लोकांच्या समस्या समजून घ्या आणि त्या मनसे स्टाईलने सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करा. संघटन विस्तारावर विशेष भर द्या,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

3) कराडची नागरी सेवा झाली ‘हायटेक’! दोन कोटींची अत्याधुनिक स्वच्छता व अग्निशमन वाहने दाखल
सातारा |
कराड | दि. १ : कराड शहराच्या स्वच्छता आणि आपत्कालीन सेवांना मोठे बळ मिळाले असून, नगरपरिषदेला तब्बल दोन कोटी रुपये किमतीची अत्याधुनिक सक्शन-कम-जेटिंग मशीन आणि मिनी फायर टेंडर प्राप्त झाले आहेत. या वाहनांमुळे गटार स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन तसेच आग आणि आपत्तीच्या प्रसंगी बचावकार्य अधिक जलद व प्रभावी होणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदेला सुमारे एक कोटी रुपये किमतीची ८ हजार लिटर क्षमतेची सक्शन-कम-जेटिंग मशीन मिळाली आहे. या मशीनद्वारे गटारे, सीवर लाईन, मॅनहोल आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांतील गाळ व कचरा यांत्रिक पद्धतीने साफ करता येणार आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना धोकादायक परिस्थितीत गटारात उतरून काम करण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, पावसाळ्यातील तुंबलेल्या गटारांच्या समस्येलाही दिलासा मिळणार आहे.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या नगर प्रशासन संचालनालयामार्फत अग्निशमन विभागाला सुमारे ९८ लाख रुपये किमतीचे Force Gurkha 4×4 Mini Fire Tender वाहन मिळाले आहे. अरुंद रस्ते, दाट लोकवस्ती तसेच ग्रामीण व औद्योगिक भागातही हे वाहन वेगाने पोहोचू शकणार असून, त्यामध्ये पाण्याची टाकी, फोम यंत्रणा, आधुनिक रेस्क्यू उपकरणे, फर्स्ट एड बॉक्स आणि आवश्यक आपत्कालीन साहित्य उपलब्ध आहे.
ही दोन्ही वाहने उपलब्ध होण्यासाठी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनातून हा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.
नगरपरिषदेने नागरिकांना अधिक जलद, सुरक्षित आणि दर्जेदार नागरी सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, या अत्याधुनिक वाहनांमुळे कराडच्या नागरी व्यवस्थापनात आधुनिकतेचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

4)

राज्यभरातील माजी सैनिक एकवटले; सैनिक कल्याण विभागातील रिक्त पदांवर सरकारला धारेवर धरले!

पुण्यात राज्यस्तरीय माजी सैनिक मेळावा; सैनिक कल्याण विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची जोरदार मागणी
सातारा |
कराड | दि. ०१ : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे महाराष्ट्रातील माजी सैनिकांचा राज्यस्तरीय मेळावा उत्साहात पार पडला. माजी सैनिक शिखर एकता संघाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच शिवाजी अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या मेळाव्यात राज्यभरातील हजारो माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि विविध माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सैनिक कल्याण विभाग, पुणेचे संचालक (नि.) कर्नल दीपक ठोंगे होते. उपसंचालक तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (नि.) मेजर शिल्पा खरपकर आणि माजी उपसंचालक ले. कर्नल सतेश हंगे (नि.) यांची प्रमुख उपस्थिती होती.
सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्ह्याच्या वतीने माजी सैनिक प्रशांत कदम यांनी माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. राज्यातील ३४ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदांपैकी केवळ १४ अधिकारी कार्यरत असल्याने माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि त्यांच्या वारसांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात सुमारे ७० हजार माजी सैनिक व सैनिक कुटुंबीय असूनही पूर्णवेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नसल्याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली. तसेच सैनिक कल्याण निधीतून मिळणारी आर्थिक मदत अनेक महिन्यांपासून रखडल्याने लाभार्थ्यांचे हाल होत असून ती तातडीने वितरित करण्याची मागणीही करण्यात आली.
यावर अध्यक्षीय भाषणात कर्नल दीपक ठोंगे यांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदांसाठी लवकरच मुलाखती घेऊन नियुक्त्या करण्यात येतील तसेच प्रलंबित आर्थिक मदतही तातडीने वितरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
या मेळाव्यास सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य, त्रिदल सैनिक संघटना, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, राष्ट्रवादी सैनिक सेल (अजित पवार गट), भारतीय जवान किसान पार्टी तसेच राज्यातील विविध जिल्हा व तालुका स्तरावरील माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मागण्या : • राज्यातील रिक्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदे तातडीने भरावीत.
• सातारा जिल्ह्यास कायमस्वरूपी पूर्णवेळ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नियुक्त करावा.
• सैनिक कल्याण निधीतून प्रलंबित आर्थिक मदत त्वरित वितरित करावी.
• माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय आणि वारसांना शासकीय सेवा वेळेत व सुलभपणे उपलब्ध करून द्यावी.

5) ‘अंतिम प्रवासाला सन्मान’! जिंतीच्या नवचैतन्य तरुणांचे श्रमदान; स्मशानभूमीला दिले नवजीवन
सातारा |
कराड | दि. ०१ :”माणूस जिवंत असताना सुखसोयींसाठी झगडतो; पण त्याचा शेवटचा प्रवासही सन्मानाने व्हावा,” या संवेदनशील विचाराला कृतीची जोड देत कराड तालुक्यातील जिंती येथील नवचैतन्य गणेश मंडळाच्या तरुणांनी गावातील दुर्लक्षित स्मशानभूमीचे रूप पालटण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. कोणतीही प्रसिद्धी किंवा स्वार्थाची अपेक्षा न ठेवता तरुणांनी श्रमदानातून स्मशानभूमीला नवसंजीवनी दिली.
गावातील स्मशानभूमीच्या शेडवरील पत्रे तुटलेली, परिसरात झाडी-झुडपे वाढलेली आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही परिस्थिती पाहून नवचैतन्य गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ एकत्र आले आणि स्वच्छता व नूतनीकरण मोहिमेला सुरुवात केली.
हातात झाडू, फावडे, घमेले आणि खुरपे घेऊन तरुण सकाळपासूनच कामाला भिडले. अवघ्या एका दिवसात संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आणि तुटलेली पत्रे बदलण्याचे कामही सुरू करण्यात आले. या श्रमदानामुळे स्मशानभूमीचे रूपच पालटले.
या उपक्रमातून “तरुणांनी ठरवलं तर गाव बदलू शकतं,” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला. सामाजिक बांधिलकी जपत गावाच्या सार्वजनिक संपत्तीचे जतन करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
या मोहिमेत नवचैतन्य गणेश मंडळाचे पदाधिकारी, सर्व तरुण कार्यकर्ते आणि जिंती ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.
“स्मशानभूमी हे प्रत्येकाचे अंतिम चिरस्थान आहे. त्या जागेचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. तरुणांनी पुढाकार घेऊन केलेले हे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून इतर गावांसाठीही आदर्श ठरेल.” – जिंती ग्रामस्थ

6) कराडच्या रोटरीची नवी कमान चंद्रशेखर पाटील यांच्या हाती; ७०व्या वर्षी समाजसेवेचा नवा संकल्प!
सातारा | कराड, दि. १ :
समाजसेवा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कराडच्या रोटरी वर्ष २०२६-२७ साठी अध्यक्षपदी रो. चंद्रशेखर पाटील तर सचिवपदी रो. सुनील चाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. नव्या कार्यकारिणीने अधिक व्यापक, परिणामकारक आणि लोकाभिमुख सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
उपाध्यक्षपदी रामचंद्र लाखोले, खजिनदारपदी प्रबोध पुरोहित आणि क्लब ट्रेनरपदी शशांक पालकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील अनुभवी सदस्यांची संचालक मंडळावर निवड करून सामाजिक प्रकल्पांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
यंदा रो. जयेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ अंतर्गत ११ जिल्ह्यांतील १०९ रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, रोटरी क्लब ऑफ कराड यंदा आपल्या स्थापनेचे ७० वे वर्ष साजरे करत असून, गेल्या सात दशकांत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, युवक विकास आणि सामाजिक सेवेत मोलाचे योगदान दिले आहे.
नूतन अध्यक्ष रो. चंद्रशेखर पाटील यांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत ॲनिमिया फ्री इंडिया, कर्करोग जनजागृती, हँड्स फॉर ह्युमॅनिटी, अन्नछत्र योजनेंतर्गत मूकबधिर विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार, गर्भसंस्कार शिबिरे, नेत्रतपासणी, सीडबॉल निर्मिती, वृक्षारोपण, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा तसेच जलतरण व ॲथलेटिक्स स्पर्धांसारखे विविध उपक्रम राबविण्याची माहिती दिली.
सचिव रो. सुनील चाळके यांनी विद्यार्थी, दिव्यांग, महिला सक्षमीकरण आणि समाजहिताच्या योजनांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगितले. रोटरीच्या सात प्रमुख फोकस क्षेत्रांद्वारे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत सेवाकार्य पोहोचविण्यासाठी क्लब कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
७० वर्षांची गौरवशाली परंपरा आणि नव्या नेतृत्वाचा उत्साह यांच्या बळावर रोटरी क्लब ऑफ कराड आगामी वर्षात समाजोपयोगी उपक्रमांना नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

7)

“विद्यार्थी-केंद्रित, समाजाभिमुख वैद्यकीय शिक्षणाची गरज; कृष्णा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात डॉ. अभिजात शेठ यांचे प्रतिपादन”

१४ व्या दीक्षांत सोहळ्यात ९७२ विद्यार्थ्यांना पदवी, ३३ जणांना पीएच.डी.; संशोधन, नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणावर भर
सातारा |
कराड, दि. १ : आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक व्यावसायिकाने ज्ञान, नैतिकता, चिकित्सक दृष्टिकोन आणि जागतिक जबाबदारी यांचा समतोल साधणे आवश्यक असून भविष्यातील वैद्यकीय शिक्षण अधिक विद्यार्थी-केंद्रित, समाजाभिमुख आणि जागतिक दृष्टीकोन असलेले असावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांनी केले.
कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १४ व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले होते. विद्यापीठाच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य शामियान्यात उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. पोलिस बँडच्या मानवंदनेनंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिनगारे, डॉ. नीलम मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध अधिविभागांतील ९७२ विद्यार्थ्यांना पदवी, ३३ संशोधकांना पीएच.डी., तर विविध शाखांतील २६ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले.
डॉ. अभिजात शेठ म्हणाले, “दीक्षांत समारंभ हा केवळ पदवीदानाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचा गौरव आहे. शिक्षणाचा उद्देश केवळ रोजगार मिळवणे नसून सक्षम, संवेदनशील आणि समाजाभिमुख नागरिक घडविणे हा आहे. वैद्यकीय क्षेत्रात ज्ञानासोबत सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीही तेवढीच महत्त्वाची आहे.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश भोसले यांनी समुदायाभिमुख शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष यांना प्राधान्य देत कृष्णा विश्व विद्यापीठ जागतिक दर्जाचे शैक्षणिक मॉडेल विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. संशोधन प्रकल्प आणि पेटंट्समध्ये झालेल्या वाढीचाही त्यांनी उल्लेख केला.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी रोबोटिक मेडिसिन, प्रिसिजन मेडिसिन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अॅनालिटिक्समुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल होत असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाही रुग्णांप्रती करुणा, सहानुभूती आणि मानवी मूल्ये जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाचा आढावा सादर केला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कृष्णा विद्यापीठ देशातील सर्वोत्तम; डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाचे डॉ. अभिजात शेठ यांच्याकडून कौतुक”
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांनी कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि संशोधनाभिमुख वाटचालीचे विशेष कौतुक केले. “कृष्णा विश्व विद्यापीठ हे देशातील उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षण आणि सर्वोत्तम पायाभूत सुविधांसाठी ओळखले जाते. कुलपती डॉ. सुरेश भोसले हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र आणि मानाचे स्थान निर्माण केले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

8) “रेकॉर्ड रूम की ‘वेटिंग रूम’?” कराड तहसीलच्या अभिलेख कक्षात नागरिकांची फरफट; दिरंगाई, कथित अतिरिक्त वसुली अन् ‘व्हीआयपी’ संस्कृतीवर सवाल!
सातारा | कराड, दि. १ :
कराड तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष (रेकॉर्ड रूम) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जुने ७/१२ उतारे, जन्म-मृत्यू दाखले आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे मिळवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दिवसन्-दिवस हेलपाटे मारावे लागत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. कामकाजातील दिरंगाई, कथित अतिरिक्त वसुली, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि सर्वसामान्यांना मिळणारी दुय्यम वागणूक यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामीण भागासह शहरातील शेकडो नागरिक दररोज विविध शासकीय कामांसाठी अभिलेख कक्षात येतात. मात्र अर्ज करूनही कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने अनेकांना दोन ते तीन वेळा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे नागरिक सांगतात. परिणामी वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करण्याची वेळ सर्वसामान्यांवर येत आहे.
नियमांनुसार माफक शुल्कातl मिळणाऱ्या काही कागदपत्रांसाठी प्रत्यक्षात अधिक पैसे घेतले जात असल्याची चर्चा असून, या कथित अतिरिक्त वसुलीची निष्पक्ष चौकशीL करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ऑनलाइन सेवा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कागदपत्रांसाठी वारंवार कार्यालयात जावे लागत असल्याने ऑनलाइन व्यवस्थेच्या परिणामकारकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी संख्या पुरेशी असूनही कामाचा वेग अत्यंत संथ आहे. काही अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोपही केला जात असून, त्यामुळे अर्जांचा ढीग वाढत आहे आणि नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
प्रतिष्ठितांसाठी ‘फास्ट ट्रॅक’, सर्वसामान्यांसाठी ‘वेटिंग’?
कार्यालयात काही मोजक्या व्यक्तींची कामे अल्पावधीत पूर्ण होत असताना सर्वसामान्य नागरिकांना मात्र दिवसन्-दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे कामकाजात समानतेचे तत्त्व पाळले जाते का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सीसीटीव्ही आहेत… पण चालू आहेत का?
अभिलेख कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यरत आहे की नाही, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. पारदर्शकतेसाठी अत्यावश्यक असलेल्या या यंत्रणेची नियमित तपासणी होते का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वरिष्ठ महसूल प्रशासनाने चौकशी करावी
अभिलेख कक्षातील संपूर्ण कामकाजाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, कथित अनियमितता आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना वेळेत, पारदर्शक व सन्मानाने सेवा मिळेल अशी प्रभावी व्यवस्था उभारावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button