वाई:-“रस्त्यासाठी राखीव जागेवरील अतिक्रमणावर नगरपरिषदेचे मौन; पाणीपुरवठा विभागातील बिलांच्या व्यवहारावरही संशय – पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा!”
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“रस्त्यासाठी राखीव जागेवरील अतिक्रमणावर नगरपरिषदेचे मौन; पाणीपुरवठा विभागातील बिलांच्या व्यवहारावरही संशय – पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा!”

वाई : रस्त्यासाठी राखीव जागेवरील अतिक्रमण हटवा; पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाची चौकशी करा, अन्यथा आंदोलन – पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा इशारा
प्रतिनिधी : नित्यानंद मोरे, वाई
वाई नगरपरिषद हद्दीतील ब्राह्मणशाही परिसरातील सिटी सर्व्हे क्रमांक 1101 व 1107-ब येथील रस्ता रुंदीकरणासाठी राखीव असलेल्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे तसेच नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कामकाजाची चौकशी करण्यात यावी, अन्यथा पंधरा दिवसांनंतर वाई नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीने दिला आहे.
ब्राह्मणशाही येथील संबंधित सिटी सर्व्हे क्रमांकांमध्ये सुमारे 27.194 चौरस मीटर क्षेत्र रस्ता रुंदीकरणासाठी आरक्षित आहे. मात्र या जागेवर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एका सायकल विक्रीच्या मोठ्या व्यावसायिक दुकानाचे अतिक्रमण असल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टीने यापूर्वी तीन ते चार वेळा नगरपरिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. तसेच महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास मंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली होती. नगरविकास विभागाने या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असतानाही वाई नगरपरिषदेने कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत तसेच त्यापूर्वीही वाई शहरातील जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधित ठेकेदार तेज ट्रेडर्स यांना विविध देयके अदा करण्यात आली आहेत. मात्र या कामांच्या पूर्ततेचे अहवाल, प्रत्यक्ष कामांचे छायाचित्रे किंवा इतर पुरावे मागवूनही उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही पाणीपुरवठा विभागाच्या जनमाहिती अधिकारी जाधव यांनी माहिती न दिल्यामुळे संशय अधिक बळावला असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. काम पूर्ण झाल्याचे कोणतेही दस्तावेज अथवा पुरावे नसताना देयके अदा करण्यात आली का, असा सवाल उपस्थित करत पाणीपुरवठा अधिकारी जाधव आणि ठेकेदार तेज ट्रेडर्स यांच्या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना निवेदन देऊन या दोन्ही प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंधरा दिवसांच्या आत संबंधित विषयांवर ठोस निर्णय किंवा लेखी उत्तर मिळाले नाही तर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. जयदीप भाई कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
त्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही तर हे आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत स्वरूपात करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाई तालुका अध्यक्ष विजयभाऊ सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हा संघटक विकासदादा जाधव, तालुका संघटक मनोज बापू सातपुते, युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, शहराध्यक्ष रणवीर परदेशी, युवक उपाध्यक्ष रोहित कवळे, अजित तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




