कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोबाईल ॲपवरून होणार जनगणना; बावधनमध्ये ‘डिजिटल जनगणना २०२७’ला सुरुवात!

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) मोबाईल ॲपवरून होणार जनगणना; बावधनमध्ये ‘डिजिटल जनगणना २०२७’ला सुरुवात!

वाई प्रतिनिधी : बावधन (ता. वाई) येथे जनगणना २०२७ च्या कामकाजाला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने मोबाईल ॲपच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. स्वातंत्र्यानंतरची ही आठवी आणि देशातील एकूण १६ वी जनगणना ठरणार आहे.
जनगणना ही लोकसंख्या, साक्षरता, शिक्षण, निवास व्यवस्था, घरगुती सुविधा, भाषा आदी महत्त्वपूर्ण माहितीचा विश्वासार्ह स्रोत मानली जाते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे अचूक नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बावधन गावासाठी एकूण ३ पर्यवेक्षक व १९ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये बावधनसह वाघजाईवाडी, शेलारवाडी, म्हातेकरवाडी आणि पांढरेचीवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
या जनगणना प्रक्रियेसाठी संकेत साळुंखे, निखिल मोरे आणि ललिता बोडके यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चार्ज ऑफिसर तथा तहसीलदार श्रीमती सोनाली मेटकरी यांनी ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की, “प्रगणक जनगणनेसाठी घरी आल्यानंतर नागरिकांनी योग्य आणि अचूक माहिती द्यावी, जेणेकरून शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील.”
यावेळी उपसरपंच उदयसिंह पिसाळ, सर्व पर्यवेक्षक, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व प्रगणक उपस्थित होते.

2) वाई:-“मृत्यूच्या दारात उभं कुसगाव!” मुख्य विद्युत डीपीला भीषण आग; तरुणांच्या धाडसामुळे टळला महाभयंकर अनर्थ – महावितरणच्या हलगर्जीपणाविरोधात ग्रामस्थांचा संतापाचा स्फोट; ‘डीपी हटवा, नाहीतर आंदोलन’चा इशारा.

वाई, दि. १७ : कुसगाव (ता. वाई) येथे आज सकाळी गावातील मुख्य विद्युत डीपीला अचानक भीषण आग लागून संपूर्ण गाव हादरले. मुख्य वस्तीत आणि घरांच्या अगदी शेजारी असलेल्या या डीपीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने मोठ्या जीवितहानीची भीती निर्माण झाली होती. मात्र, गावातील धाडसी तरुणांनी प्रसंगावधान राखत जिवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणल्याने कुसगाव एका महाभयंकर दुर्घटनेतून थोडक्यात बचावले.


कुसगाव येथील ग्रामस्थ सदाशिव सोनबा वरे यांच्या घराशेजारी असलेल्या मुख्य विद्युत डीपीमधून आज सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक ठिणग्या पडू लागल्या आणि काही क्षणांतच डीपीने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच गावातील तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही सुरक्षा साधने नसतानाही त्यांनी धाडसाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे शेजारील घरांना आग लागण्यापासून वाचवण्यात यश आले.
या घटनेनंतर महावितरणच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. संबंधित डीपीचे लोखंडी खांब जमिनीलगत पूर्णपणे सडले असून डीपी धोकादायक पद्धतीने घरांच्या दिशेने कलली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी ही धोकादायक डीपी सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी यापूर्वी अनेकदा महावितरण प्रशासनाला लेखी निवेदने दिली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आजची घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“आज नशीब साथ दिल्याने गाव वाचलं; पण प्रशासन अजून किती मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असून, डीपी तातडीने न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

3) वाई:-महावितरणची धडाकेबाज तत्परता!
कुसगावातील जळालेला डिस्ट्रिब्युशन बॉक्स अवघ्या काही तासांत बदलला; मोठा अनर्थ टळला – अधिकारी-कर्मचाऱ्यांची युद्धपातळीवरील मोहीम; ग्रामस्थांच्या सहकार्याने वीजपुरवठा पुन्हा सुरळीत.

सातारा प्रतिनिधी |
वाई, दि. १७ : कुसगाव (ता. वाई) येथील लोकवस्तीतील डिस्ट्रिब्युशन बॉक्सला आज सकाळी अचानक भीषण आग लागल्याने काही काळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक युवकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे, अवघ्या काही तासांत नवीन डिस्ट्रिब्युशन बॉक्स बसवून गावातील वीजपुरवठा सुरक्षितपणे पूर्ववत करण्यात आला.
सकाळी गावाला वीजपुरवठा करणाऱ्या डिस्ट्रिब्युशन बॉक्समधून अचानक आगीच्या ज्वाला उसळू लागल्या. हा प्रकार नागरिक नारायण वरे आणि किरण बगाडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने महावितरणच्या व्याहाळी शाखेचे शाखाधिकारी सागर मगदूम यांना माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित भागाचा वीजपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टळली.
यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. महावितरणचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि नुकसानीची पाहणी केली. डिस्ट्रिब्युशन बॉक्स पूर्णतः जळाल्यामुळे गावाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शाखाधिकारी सागर मगदूम, कर्मचारी अमर महागडे, अजित ननवरे, तुषार जगताप आणि गुंजन शेंडे यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले.
तातडीने नवीन डिस्ट्रिब्युशन बॉक्स उपलब्ध करून तो बसवण्यात आला. सर्व सुरक्षा उपाययोजनांची खात्री करून दुपारपर्यंत गावातील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. महावितरणच्या या वेगवान आणि जबाबदार कामगिरीबद्दल कुसगाव ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
दरम्यान, “संबंधित डीपी पूर्वी गावाच्या लोकवस्तीपासून दूर होता. मात्र, आता त्या परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढल्याने सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने डीपी सुरक्षित जागी हलवणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडे पर्यायी जागेची मागणी केली असून, जागा उपलब्ध होताच स्थलांतराचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल,” अशी माहिती व्याहाळी शाखेचे शाखाधिकारी सागर मगदूम यांनी दिली.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button