ओगलेवाडी:-गुणवंतांचा घरपोच सन्मान; माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगडने जपली यशाची उज्ज्वल परंपरा.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

गुणवंतांचा घरपोच सन्मान; माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगडने जपली यशाची उज्ज्वल परंपरा.

ओगलेवाडी : -यशवंत शिक्षण संस्था संचलित माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगड हजारमाची या विद्यालयाने एसएससी मार्च 2026 परीक्षेत 87.17 टक्के गुणवत्तापूर्ण निकालाची नोंद करत ग्रामीण भागातील शाळा असूनही शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून कौतुकास्पद उपक्रम राबविला.
विद्यालयात कुमारी राशी सोमनाथ सुरवसे हिने 83 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. चिरंजीव जयदीप सयाजी जाधव यांनी 81.20 टक्के गुणांसह द्वितीय, कुमारी अमृता उत्तम कुंभार हिने 78 टक्के गुणांसह तृतीय, कुमारी कृतिका किसन जगताप हिने 77.66 टक्के गुणांसह चतुर्थ तर कुमारी साक्षी संतोष कुंभार हिने 76.60 टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवत विशेष नैपुण्य संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पगुच्छ, दोन वह्या आणि एक पेन भेट देत त्यांचा सन्मान केला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनी विद्यालयाच्या या संवेदनशील कृतीचे मनापासून कौतुक केले.
एसएससी फेब्रुवारी 2026 परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 39 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 5 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, 8 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 14 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर 7 विद्यार्थ्यांनी पास श्रेणीत यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री. डी. ए. पाटील, संस्थेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा पानवळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पालक, ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या यशासाठी इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षिका सौ. अंजली पाटील, इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री. सुरेश वेताळ, गणित विषयाचे शिक्षक श्री. तानाजी राजमाने, सौ. वर्षा पाटील, सौ. सुवर्णा शिनगारे आणि सौ. शशिकला पोळ यांनी विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले. विद्यालयाच्या या यशस्वी वाटचालीमुळे परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



