वाई:-किसन वीर महाविद्यालयात बी.सी.ए विभागाचा ‘टेक फेस्ट’ उत्साहात संपन्न.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण- 8208717483

किसन वीर महाविद्यालयात बी.सी.ए विभागाचा ‘टेक फेस्ट’ उत्साहात संपन्न.

सातारा प्रतिनिधी रेखा येवले
वाई, दि. १८ मार्च २०२६ येथील किसन वीर महाविद्यालयाच्या बी.सी.ए विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘टेक फेस्ट’ कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. मदनदादा भोसले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत आजच्या व्याख्यात्यांचे उदाहरण विशेषत्वाने अधोरेखित केले. परदेशातील उच्च पगाराची नोकरी आणि ऐश्वर्याचा त्याग करून मातृभूमीत परत येत साताऱ्यासारख्या ठिकाणी स्वतःची आय.टी. कंपनी उभारणारे श्री. मंदार काळे हे व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा आदर्श व्यक्तींमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा जबाबदारीने आणि विचारपूर्वक वापर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सातत्य, चिकाटी आणि योग्य दृष्टीकोन या गुणांच्या जोरावरच विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग क्षेत्रातील तज्ञ श्री. मंदार काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सूक्ष्म निरीक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील प्रत्येक घटनेकडे बारकाईने पाहून त्यातून योग्य निष्कर्ष काढणे आणि सातत्याने प्रयत्न करत राहणे यामुळेच कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते, असे त्यांनी सांगितले. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींची माहिती देत विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून वळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, बी.सी.ए समन्वयक प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे, विभागप्रमुख श्रीमती अर्चना कदम यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘टेक फेस्ट’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, C/C++ प्रोग्रामिंग, प्रोजेक्ट व PPT सादरीकरण, गेमिंग (Free Fire, BGMI), ट्रेझर हंट आणि पोस्टर प्रेझेंटेशन यांचा समावेश होता. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपले तांत्रिक कौशल्य सादर करण्याची तसेच नवकल्पनांना वाव देण्याची संधी मिळाली.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना महालक्ष्मी दुकानाचे प्रो.प्रा. श्री. अविनाश जाधव यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
तसेच चॅम्पियनशीप ट्रॉफी मुधोजी महाविद्यालय, फलटण यांनी पटकावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती रेश्माबानो मुलाणी यांनी केले, तर बी.सी.ए विभागातील श्रीमती कोमल चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.
बी.सी.ए विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा ‘टेक फेस्ट’ यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल ओळख होऊन त्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




