शिलाँग:-महिला दिनानिमित्त ‘स्त्रीत्वाची कुरुक्षेत्रे’ कविता चर्चेत; वेदांतिका देसाई यांचा स्त्रीस्वाभिमानाचा प्रभावी संदेश.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिलॉंग:-महिला दिनानिमित्त ‘स्त्रीत्वाची कुरुक्षेत्रे’ कविता चर्चेत; वेदांतिका देसाई यांचा स्त्रीस्वाभिमानाचा प्रभावी संदेश.

*NIFT Shillong:-*
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वेदांतिका देसाई यांनी सादर केलेली “स्त्रीत्वाची कुरुक्षेत्रे” ही कविता सध्या चर्चेचा विषय ठरत असून स्त्रीस्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा ठाम संदेश देत आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने सादर झालेली “स्त्रीत्वाची कुरुक्षेत्रे” ही कविता स्त्रीच्या स्वाभिमानाचा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा प्रभावी संदेश देणारी ठरत आहे. NIFT Shillong येथील वेदांतिका देसाई यांनी ही कविता लिहिली असून महाभारतातील द्रौपदीच्या प्रतीकातून स्त्रीच्या संघर्षाची आणि धैर्याची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.
कवितेतून महिलांनी परंपरा आणि समाजाच्या चौकटीत अडकून न राहता अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य दाखवावे, असा ठाम संदेश देण्यात आला आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही कविता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
*कविता :-*
स्त्रीत्वाची कुरुक्षेत्रे…
जर प्रश्न विचारणं
सुसंस्कृतपणाचं लक्षण नसेल,
तर तू,
प्रश्नांनी कुरुसभा मौन करणारी
असंस्कृत द्रौपदी निवड…
जर बांधू पाहतील
ते तुझ्या व्यक्तिस्वातंत्र्याला
धर्म आणि परंपरेच्या चौकटीत,
तर तू,
त्याच धर्मावर प्रश्न उभे करणारी
उद्धट द्रौपदी निवड…
जर दोषी ठरवतील तुला
त्यांच्या नाकर्तेपणावर डोळेझाक करण्यासाठी,
तर तू,
तुझ्या पदराला हात घालून तुझा स्वाभिमान
मातीमोल करणाऱ्या प्रत्येक दुष्शासनाविरोधात
कुलनाशिनी द्रौपदी निवड…
जर उठवले जात असतील प्रश्न
त्याच्या मैत्रीस्तव तुझ्या चारित्र्यावर,
तर तू,
येन केन प्रकारेण तुझ्यासाठी धावून
येणाऱ्या कृष्णाखातर
बदनाम द्रौपदी निवड…
जर उभी केली जात असेल तुला
त्या हीन द्युतसभेसमोर, आणि
थोपवले जात असतील
अमानुष निर्णय त्यांचे,
तर तू,
गांधारीच्या पातिव्रत्याचे
गोडवे गाण्याऐवजी
बेधडकपणे युधिष्ठिरालाच प्रश्न करणारी
अहंकारी द्रौपदी निवड…
आणि जेव्हा जेव्हा ललकारेल वेळ
तुझ्या स्त्रीत्वाला, अन्
मागितले जातील दाखले तुझ्या निर्दोषत्वाचे,
तेव्हा तेव्हा तू अग्निपरीक्षा नव्हे तर
पुन्हा पुन्हा कृष्णविचाराने कुरुक्षेत्राची रणभूमी पेटव…
कारण
मौनाने कदाचित टिकतील दुबळ्या परंपरा,
पण न्यायाला मात्र द्रौपदीची प्रतिक्षा असते…
— वेदांतिका देसाई, NIFT शिल्लग




