मायणी:-मायणीत होणार सिद्धनाथाच्या तीन यात्रा वर्गणीमुळे व्यावसायिक, व्यापारी व नोकरदार त्रस्त,सर्वसमावेशक एकच यात्रा हवी.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मायणीत होणार सिद्धनाथाच्या तीन यात्रा वर्गणीमुळे व्यावसायिक, व्यापारी व नोकरदार त्रस्त,सर्वसमावेशक एकच यात्रा हवी.
-मायणी प्रतिनिधी——-
राजकीय चक्रव्युहात अडकलेली येथील श्री सिद्धनाथाची यात्रा सर्वांनी मिळून एकत्र करावी. अशी सर्वसामान्यांची इच्छा असताना वर्षानुवर्षे समांतर यात्रेच्या संख्येत वाढच होत आहे. यंदा तर श्री सिद्धनाथाच्या तीन यात्रा होणार आहेत. यात्रेसाठीच्या वर्गणीमुळे व्यावसायिक, व्यापारी व नोकरदारांची मुस्कटदाबी होत असून सर्वसमावेशक एकच यात्रा भरविण्याची मागणी होत आहे.
देव दीपावलीस येथील श्री सिद्धनाथाची यात्रा भरविण्यात येते. यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. सामाजिक ऐक्य वृद्धिंगत व्हावे. यासाठी सर्वांनी गुण्या गोविंदाने, एकोप्याने राहून सर्वसमावेशक एकच यात्रा भरवावी. अशी नागरिकांची इच्छा आहे. मात्र, राजकीय गट, स्थानिक नेते आणि त्यांचे काही अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे त्यावर पाणी फिरत आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी, गट तट शाबूत राहण्यासाठी स्वतंत्र यात्रेचा घाट घातला जात आहे. यात्रा भरविण्याचा अधिकार ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्टला आहे. तरीही वेगवेगळे राजकीय गट स्वतंत्र यात्रा भरवून एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करतात. येथील सत्ताधारी गुदगे आणि येळगावकर गटाकडून आत्तापर्यंत स्वतंत्र यात्रेचे आयोजन करण्यात येत होते. यंदा प्रथमच हिम्मत देशमुख आणि समर्थकांच्या माध्यमातून तिसऱ्या यात्रेचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. तीनही गटांच्या यात्रापूर्व नियोजनाच्या बैठका झाल्या असून कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. त्यामुळे तीनही गटांचे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम, बैलगाडा शर्यती, कुस्त्या, मनोरंजनाचे कार्यक्रम, अशी नानाविध कार्यक्रमाची रेलचेल होणार आहे.
दरम्यान, एकाचा ग्रामदेवतेच्या स्वतंत्र, वेगवेगळ्या यात्रांचा फटका लोकांना बसत असतो. सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार यांना अनिच्छेने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. राजकीय दबावामुळे त्यांची मुस्कटदाबी होत असते. यात्रा काळात होणाऱ्या विविध कार्यक्रमातून भाषणे ठोकली जातात. त्यावेळी नेते व कार्यकर्ते एकमेकांची उणीधुनी काढत असतात. एकामेकांवर चिखलफेक करीत असतात. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा तर चिखलफेकीला चेव चढणार आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होते. संवादाऐवजी वाद निर्माण होतो. सामाजिक स्वास्थ्य बिघडते. मूळ यात्रेचा उद्देश बाजूला पडतो. ते सर्व टाळण्यासाठी सर्वसमावेशक एकच यात्रा भरविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी गावातील जुन्या जाणत्या, शब्दाला किंमत असलेल्या बुजुर्ग व्यक्तींनी पुढाकार घेऊन सर्वसमावेशक एकच यात्रा होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
कोट : गावाच्या एकोपा व हिताच्या दृष्टीने एकच यात्रा व्हावी. सर्व भक्त, ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांचे हेच मत आहे. सामान्य माणसाला, व्यापारी वर्गाला यात्रेचा भुर्दंड बसू नये. ग्रामदैवतचे नावलौकिक व्हावा.
– डॉ. विकास देशमुख
( सामाजिक कार्यकर्ते, मराठा समन्वयक, मायणी)




