वाईत ‘नारी शक्ती रन – २०२५’ चा उत्साहपूर्ण सोहळा
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाईत ‘नारी शक्ती रन – २०२५’ चा उत्साहपूर्ण सोहळा.

वाई (दि. २५ सप्टेंबर): टीम वाई फाउंडेशनतर्फे आयोजित ‘नारी शक्ती रन – २०२५’ या विशेष धावण्याच्या शर्यतीचे आयोजन नुकतेच शहरात करण्यात आले. बुधवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी ६:३० वाजता वाई कोर्टासमोरून सुरू झालेल्या या ‘रन फॉर नेचर’ कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांचे आरोग्य आणि निसर्गाचे महत्त्व या दुहेरी संदेशासह ही ३ किमीची शर्यत पार पडली. या शर्यतीत एकूण १५० ते १७५ महिलांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
वाई परिसरात आयोजित केलेल्या या दौडमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी वाई कोर्ट, गणपती मंदिर आणि शाहिर चौक या मार्गावर धावून परत त्याच ठिकाणी आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी ६:३० वाजता सौ. रेखा कोचळे आणि सौ. ज्योती गाढवे यांनी सर्व सहभागींसाठी वॉर्म-अप सत्र घेतले, ज्यामुळे वातावरणात उत्साहाचे भरभरून संचार झाले.
शर्यतीचा शुभारंभ (फ्लॅग ऑफ) डॉ. सौ.आशा बाबर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. धावणाऱ्या प्रत्येक महिलेला त्यांच्या सहभागाचे प्रमाणपत्र आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारे एक फुलाचे रोपटे देण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांसाठी नाश्त्याचीही सोय करण्यात आली होती, ज्यात गरमागरम खिचडी आणि केळीचा समावेश होता.
यावेळी, कार्यक्रमाचे स्वागत आणि बक्षीस वितरण सौ. पल्लवी माळी यांनी केले, तर सौ. रुपाली देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. गरवारे वाई हाफ मॅरेथॉन नूतन रेस डायरेक्टर विलास माळी सर यांनी देखील सर्वांचे धन्यवाद मानले .
या प्रसंगी श्री. राजगुरु कोचळे यांनी येत्या २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या गरवारे वाई हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आपले आरोग्य जपण्याचा त्यांनी मोलाचा संदेश दिला.या शर्यतीचे नेटके आयोजन टीम वाई फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी केले होते.




