महाबळेश्वर:-“वृक्षारोपणातून हरितसमृद्धीचा संकल्प” – स्वराज्य फाउंडेशनचा उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
“वृक्षारोपणातून हरितसमृद्धीचा संकल्प” – स्वराज्य फाउंडेशनचा उपक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी.
सातारा(महाबळेश्वर):-
पर्यावरण संतुलन, ग्रामीण समृद्धी आणि समाजहिताचा विचार केंद्रस्थानी ठेवत, स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित वृक्षारोपण उपक्रम रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी *मौजे कोट्रोशी, महाबळेश्वर* या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. सलग दुसऱ्या वर्षी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाने निसर्गप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामविकास यांचा अनोखा संगम घडवला. संस्थेच्या या उपक्रमाअंतर्गत कोट्रोशी, गोरोशी, दाभे दाभेकर आणि वाळणे या गावांमध्ये सुमारे ७०० फळझाडांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला खरोशी गावाचे सुपुत्र, *कै. भिवाजी अंबाजी कदम (समाजसेवक)* यांच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करण्यात आली. समाजकार्यात सदैव अग्रेसर असलेल्या भिवाजीदादांच्या समाजसेवेला स्मरून, हा उपक्रम त्यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आला. ही सेवा म्हणजे त्यांच्या कार्याला नमन करणारी एक सजीव श्रद्धांजली ठरली.
पूर्णतः स्वयंसेवी आणि समाजाभिमुख रूपरेषा असलेल्या या कार्यक्रमाला समाजातील तरुण, ज्येष्ठ, महिला आणि शेतकरी वर्ग यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. वृक्षलागवड ही फक्त एकदिवसीय कृती नसून, त्याचे फलित पुढील काही वर्षांतच निश्चितच दिसणार आहे. या दृष्टीने स्वराज्य फाउंडेशनने *‘एक झाड – एक जबाबदारी’* हे घोषवाक्य स्वीकारत,झाडांचे संगोपन करण्याचे उपस्थितांना आवाहन करण्यात आले. श्री.विठ्ठलशेठ धनावडे (उद्योजक, तापोळा), श्री. रामचंद्र मोरे (PSI, आमशी), श्री. संजय शेलार (शिवसेना तालुकाप्रमुख, कोट्रोशी), श्री. किशोर जाधव (सरपंच, झांजवड), श्री. अजय रिंगे (अध्यक्ष, महाबळेश्वर तालुका पोलीस पाटील संघटना), श्री. प्रशांत तांबे (उद्योजक, वाळणे), श्री. अर्जुन शेलार (कोट्रोशी) या मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित करताना वृक्षारोपणाच्या माध्यमातून शेतीसमृद्धी, जलसंवर्धन आणि हरितसंवर्धन साधण्याचे महत्व अधोरेखित केले. स्वराज्य फाऊंडेशनच्या महिला कार्यकर्त्या सौ. सुजाताताई कदम (सोनाट), सौ. आशाताई कदम (खांबील) आणि सौ. स्वाती शेलार (कोट्रोशी) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जावस्तीत जास्त महिलांना समाजकार्यात सहभाग घेण्याचे आवाहन केले.
संस्थेचे सहसचिव श्री. गोविंद शिंदे (कोळघर) यांनी संस्थेच्या सर्व समाजोपयोगी योजना तसेच विविध उपक्रमांची विस्तृत माहिती उपस्थितांना करून दिली. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. संजय जाधव (चिखली) यांनी समाजातील गरजू व दुर्बल घटकांप्रती मानवी संवेदनशीलता जपत, प्रत्येकाने यथाशक्ती समाजकार्यात सक्रीय सहभाग घ्यावा तसेच केवळ वैयक्तिक आयुष्यापुरते मर्यादित न राहता, समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. श्री. राम शिंदे (तेटली) तसेच ह.भ.प. श्री. सुभाष महाराज शेलार (कोट्रोशी) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.श्री.बी.व्ही.शेलार साहेब,(कोट्रोशी),संचालक कोयना एज्युकेशन यांचेही विशेष सहकार्य लाभले.निसर्गाशी असलेले आपले ऋणानुबंध अधिक दृढ करणाऱ्या या उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष श्री. संजय उतेकर (उतेकर वानवली) यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले तसेच फार कमी कालावधीत अतिशय सुंदर नियोजन करून समस्त समाजाला उपकृत केल्याबद्दल *कोट्रोशी* ग्रामस्थांचेही विशेष आभार मानले. पुढील काळात वृक्षसंवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. निसर्गाशी नाळ जोडणारा आणि पर्यावरणाच्या रक्षणाची साक्ष देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.