वाईमध्ये एआय (AI) तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीवरील चर्चासत्राचे आयोजन – मदनदादा भोसले.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाईमध्ये एआय (AI) तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीवरील चर्चासत्राचे आयोजन – मदनदादा भोसले.
वाई: दि. १८, येथील जनता शिक्षण संस्था आणि बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.४५ वाजता किसन वीर महाविद्यालयामध्ये “कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊस शेती” या विषयावार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी दिली.
याबाबत माहिती देताना ते म्हणाले, संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे ७० ते ७५ टक्के विद्यार्थी शेतकरी पार्श्वभूमी असलेले आहेत. त्यामुळे त्यांना ऊस शेती करताना नवतंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने तसेच महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये कार्यकर्ते, शेतकरी यांनी स्वत:ची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून महाविद्यालय व संस्था उभारणीला सक्रिय मदत केली याची जाणीव मनात ठेवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांच्यासाठीही सदरच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे ऊसाच्या उत्पन्नात एकरी ४०% पर्यंत वाढ होत असल्याचे, साखर उताऱ्यात २% वाढ होत असल्याचे तसेच आधुनिक सिंचन पद्धतीने पाण्याची ५०% बचत, या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने ३०% रासायनिक खतांची बचत होत असल्याचे बारामती येथील संशोधनात सिद्ध झाले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने जमिनीचा पोत व सेंद्रिय कर्ब वाढतो तसेच हवामानाचा अंदाज अधिक अचूक मिळतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बारामती येथील सुमारे एक हजार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रत्यक्ष ऊस पीक घेतले असून त्याला अपेक्षित यश प्राप्त झाले आहे.
एआय (AI) तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होण्यासोबत शेतीचा, पर्यावरणाचा विकास होत आहे. त्यामुळे या चर्चासत्राचे आयोजन केले असून त्यामध्ये बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे तसेच ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. योगेश फाटके हे मार्गदर्शन करणार आहेत.
या चर्चासत्रासाठी नोंदणी संपूर्णपणे मोफत असून; प्रथम नोंदणी करणाऱ्या ५०० शेतकऱ्यांना कार्यशाळेस प्रवेश दिला जाणार आहे. तरी या चर्चासत्रासाठी विद्यार्थी व शेतकऱ्यांनी २१ ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, संस्था सचिव डॉ. जयवंत चौधरी व प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी केले आहे.