आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाचगणी:-सकाळ NIE चित्रकला स्पर्धेतून उमलली बालकलाकारांची प्रतिभा – विद्यानिकेतन हायस्कूल येथे रंगली विद्यार्थ्यांची सर्जनशीलता.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) पाचगणी:-सकाळ NIE चित्रकला स्पर्धेतून उमलली बालकलाकारांची प्रतिभा – विद्यानिकेतन हायस्कूल येथे रंगली विद्यार्थ्यांची सर्जनशीलता.

पाचगणी
सकाळ दैनिक समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य सकाळ NIE चित्रकला स्पर्धा विद्यानिकेतन हायस्कूल, पाचगणी येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. महाबळेश्वर तालुक्यातील तसेच पाचगणी परिसरातील विविध शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे प्रभावी प्रदर्शन केले.
विद्यानिकेतन हायस्कूल ही शाळा केवळ शैक्षणिक गुणवत्तेसाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी तालुक्यात ओळखली जाते. कला, क्रीडा, वक्तृत्व, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम यांसारख्या उपक्रमांत शाळा नेहमीच अग्रेसर असते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारी, शिस्तप्रिय व उपक्रमशील अशी ओळख असलेल्या या शाळेच्या प्रशस्त व स्वच्छ प्रांगणात ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. संस्थेचे सेक्रेटरी श्री. महेश आनंदराव बिरामणे व संस्थेच्या विश्वस्त सौ. स्वाती महेश बिरामणे यांच्या प्रेरणादायी संकल्पना व मार्गदर्शनामुळे संस्थेने शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.
शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संचालक अथर्व बिरामणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सकाळ समूहाचे विजय सुतार, मुख्याध्यापिका ज्योती परदेशी, पत्रकार रविकांत बेलोशे, चित्रकला शिक्षक प्रशांत शेळके यांच्यासह शाळेचे शिक्षकवर्ग व हॉस्टेल स्टाफ उपस्थित होते.
स्पर्धेत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर, रेखीव आणि कल्पक चित्रे साकारली. रंगसंगती, विषयांची मांडणी व बारकावे यांमुळे अनेक चित्रांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. काही विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, देशभक्ती व सामाजिक विषयांवर, तर काहींनी निसर्गसौंदर्य व बालविश्व प्रभावीपणे कागदावर उतरवले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अथर्व बिरामणे यांनी कला ही केवळ स्पर्धेपुरती मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व घडवणारी शक्ती असल्याचे सांगितले. “चित्रकलेमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भावना, विचार आणि कल्पनाशक्ती रंगांच्या माध्यमातून व्यक्त होते. मोबाईल व डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेला विसरू नये. सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वास ठेवल्यास कला जीवनात मोठी उंची गाठू शकते,” असे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुख्याध्यापिका ज्योती परदेशी यांनी सकाळ दैनिकाच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. यावेळी सकाळ समूहाचे विजय सुतार यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना, विद्यानिकेतन हायस्कूल ही शाळा दरवर्षी सकाळ दैनिकाच्या विविध स्पर्धांच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य करते, त्याबद्दल संस्थेचे विशेष आभार मानले.
सकाळ दैनिक समूहाकडून दरवर्षी राज्यभर शालेय विद्यार्थ्यांसाठी या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना चालना देणे, सर्जनशीलता वाढवणे आणि कल्पनाशक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विविध वयोगटांनुसार विषय देऊन विद्यार्थ्यांना मुक्तपणे विचार मांडण्याची संधी दिली जाते. हजारो विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा प्रेरणास्थान ठरत असून पाचगणीतील या स्पर्धेला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद विशेष उल्लेखनीय ठरला.

2) किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अर्जुन जाधव यांना पीएच.डी.प्रदान – भौतिकशास्त्र शिक्षणातील संशोधनाला शिवाजी विद्यापीठाची मान्यता.

वाई : किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय, वाई येथील उपप्राचार्य तथा अनुभवी प्राध्यापक प्रा.अर्जुन साहेबराव जाधव यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.“उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र विषयातील अभिरूचीवृद्धी कार्यक्रमाचे विकसन” या विषयावरील त्यांचा संशोधन प्रबंध विद्यापीठाने नुकताच मंजूर केला आहे.
हा संशोधन प्रबंध आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. वंदना नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. भौतिकशास्त्र हा विषय अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटतो, मात्र योग्य अध्यापन पद्धती,कृतीशील उपक्रम व अभिरुची निर्माण करणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक कसा बदलता येतो, याचा सखोल अभ्यास या संशोधनातून करण्यात आला आहे.
किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये यापूर्वी डॉ. विलास खंडाईत यांना पीएच.डी. मिळाल्यानंतर हा मान मिळवणारे प्रा.अर्जुन जाधव हे दुसरे प्राध्यापक ठरले आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडली असून संशोधन क्षेत्रातही संस्थेचा नावलौकिक वाढला आहे.
३५ वर्षांहून अधिक काळ अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रा.जाधव यांनी भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन करत हजारो विद्यार्थ्यांना घडवले आहे.त्यांनी एम.एस्सी.,एम.एड.असे उच्च शिक्षण घेतले असून एम.एस्सी. परीक्षेत शिवाजी विद्यापीठातून प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) पटकावण्याचा बहुमानही मिळवला आहे. परीक्षक,मुख्य परीक्षक,नियामक तसेच प्रश्नपत्रिका निर्माता म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
संशोधनाची तीव्र इच्छा, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर वय व इतर अडथळ्यांवर मात करून त्यांनी ही पदवी प्राप्त केली असून, हे अनेक तरुण शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील, राज्यसभेचे खासदार नितीन पाटील,जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मदनदादा भोसले, सचिव डॉ. जे.एस.चौधरी, प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रा.अर्जुन जाधव यांच्या पीएच.डी. प्राप्तीमुळे किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवे वैभव लाभले असून, भविष्यात त्यांच्या संशोधनाचा लाभ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस निश्चितच होईल, अशी भावना शिक्षणप्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

3) शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेचा अभिषेक पवार राज्य गुणवत्ता यादीत ६० वा आणि शाळेचा निकाल ९९.३७ % सुयश.

महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांच्या वतीने सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून या परीक्षेमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे च्या न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेचा चि.अभिषेक दीपक पवार इयत्ता आठवी हा विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत 60वा आलेला आहे तसेच शाळेतील एलिमेंटरी परीक्षेचा निकाल 99.37% लागलेला आहे आणि इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९५.३८ टक्के लागलेला आहे.
या दोन्ही परीक्षेसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेतील 291 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यामध्ये एलिमेंट्री परीक्षेला एकूण 161 विद्यार्थी बसले होते त्यापैकी ए श्रेणी प्राप्त विद्यार्थी 19 बी श्रेणी प्राप्त विद्यार्थी 45 आणि शेकडा निकाल 99.37% टक्के लागला आहे तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी 130 विद्यार्थी बसलेले होते त्यामध्ये ए श्रेणी प्राप्त विद्यार्थी 21 बी श्रेणी प्राप्त विद्यार्थी 32 शेकडा निकाल ९५.३८% टक्के लागलेला आहे.ही शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा प्रामुख्याने महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटक अशा या पाच राज्यातून एकाच वेळी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाते या परीक्षेला विद्यार्थी संख्या सात ते आठ लाख परिक्षार्थी सहभागी असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्य गुणवत्ता यादीतील शाळेने आपले स्थान कायम ठेवत इंटरमिजिएट ग्रेड परीक्षे मध्ये अभिषेक दीपक पवार इयत्ता आठवी हा विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत 60वा आलेला आहे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे कलाशिक्षक श्री घनःश्याम महादेव नवले व श्री संदीप गणपती माळी यांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समितीचे अध्यक्ष श्री.अमित कुलकर्णी सर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्री. अनंतजी जोशी सर शालेय समिती सदस्य श्री.सारंग कोल्हापुरे सर श्री.नितीन पोरे सर शालाप्रमुख श्री.पांडुरंग मोहिते सर पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास कल्याणकर श्री. महेश जोशी सौ.अनिता कदम तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी कौतुक व अभिनंदन केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button