नाशिक:-सर्वार्थाने शक्तिशाली हिंदू राष्ट्र हीच संघशताब्दी निमित्त डॉक्टरांना दिलेली खरी श्रद्धांजली – मंगेश खाडीलकर
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सर्वार्थाने शक्तिशाली हिंदू राष्ट्र हीच संघशताब्दी निमित्त डॉक्टरांना दिलेली खरी श्रद्धांजली – मंगेश खाडीलकर

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य यावर आधारित ‘Dr. Hedgewar : Man of the Millennia’ या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच नाशिकमध्ये पार पडले. लाडशाखीय वाणी मित्रमंडळ व लाडशाखीय वाणी नवनवहितगुज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माहेरघर’ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मुख्य वक्ते म्हणून बोलताना मंगेश खाडीलकर यांनी सांगितले की, “डॉ. हेडगेवार हे खऱ्या अर्थाने द्रष्टे नेते होते. सशक्त हिंदू समाज उभा राहिला तरच राष्ट्र टिकेल या भावनेने त्यांनी कार्य केले. संघ म्हणजे सेवा, समरसता व बलशाली युवा पिढी घडवणे हेच त्यांचे ध्येय होते. शहरी नक्षलवाद, फेक नॅरेटिव्ह किंवा समाजविघातक शक्ती यांचा विचार त्यांनी शंभर वर्षांपूर्वीच करून ठेवला होता. शाखेच्या माध्यमातून शिस्तबद्ध व आदर्श आचरणशील समाज निर्माण करणे ही त्यांची शिकवण होती.”
ते पुढे म्हणाले, “संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ठरवलेल्या पंचपरिवर्तनाच्या उपक्रमांमधून आपल्याला राष्ट्रनिर्मितीची दिशा दिसते. पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, स्वबोध (आत्मचिंतन व आत्मजागृती), सामाजिक समरसता आणि नागरी कर्तव्य या पाच क्षेत्रांतून कार्यकर्त्यांनी देशव्यापी परिवर्तन घडवून आणायचे आहे. हेच डॉक्टर हेडगेवारांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
या वेळी बोलताना वेदांच्या अभ्यासिका व प्राचार्य संयुक्ता भोसले म्हणाल्या, “हे पुस्तक वाचताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात. हिंदू राष्ट्राचे भव्य स्वप्न एका असामान्य नेतृत्वाने बघितले आणि प्रत्यक्षात उतरवले. आज संघाच्या शताब्दी वर्षात विविध क्षेत्रात कार्यकर्ते आदर्श काम करीत आहेत. शाखा ही युवकांसाठी प्रेरणास्थान आहे.”
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गिरीश रवींद्र मालपुरे (अध्यक्ष, लाडशाखीय वाणी समाज मित्रमंडळ) यांनी भूषविले. विशेष उपस्थिती संध्या राजेश कोठावदे (अध्यक्ष नवहितगुज महिला मंडळ), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मा. प्रमोद जी कुलकर्णी, शहर कार्यवाहक सुहास वैद्य, शहर सहकार्यवाह श्री रोहित जी गायधनी , श्री. सुनील भोसले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नवहितगुज मंडळाच्या अध्यक्षा संध्याताई कोठावदे यांनी केले.त्यात त्यांनी आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला पुस्तक प्रकाशन करण्याचे सौभाग्य लाभले. सूत्रसंचालन मीनलताई वाणी यांनी केले. यावेळी तीनशे हून अधिक वाचन प्रेमी व वाणी समाजातील श्रोते उपस्थित होते.
नितु ब्राह्मणकर व प्रतिभा वाणी यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला व व्यासपीठावरील मान्यवरांनी प्रमुख वक्त्या चा सत्कार केला शेवटी आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष श्री गिरीशजी मालपूरे यांनी केले कार्यक्रमांची सांगता योगिता शेंडे यांनी पसायदान गाऊन कार्यक्रमांची सांगता झाली.




