श्रीरामपूर:-“बाबासाहेबांचा अवमान म्हणजे देशाच्या आत्म्यावर घाला” – महाजनांविरुद्ध वंचित बहुजन आघाडी आक्रमक.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

“बाबासाहेबांचा अवमान म्हणजे देशाच्या आत्म्यावर घाला”

श्रीरामपूर (RPs स्टार न्यूज प्रतिनिधी)
नाशिक येथे दिनांक २६ जानेवारी रोजी झालेल्या शासकीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीरामपूर तहसीलदार यांना तीव्र शब्दांत निवेदन देण्यात आले.
प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधानाचा विजयदिन असून त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच देशाची लोकशाही, समानता व सामाजिक न्याय उभा आहे. अशा पवित्र दिवशी बाबासाहेबांचा उल्लेख टाळणे हा केवळ दुर्लक्षाचा प्रकार नसून, तो थेट संविधानाचा अपमान आहे. या कृतीतून संविधानविरोधी मानसिकता स्पष्टपणे दिसून येते, तसेच महामानवाचा अवमान व बहुजन समाजाच्या आत्मसन्मानावर केलेला थेट घाला असल्याचा ठाम आरोप निवेदनातून करण्यात आला.
या प्रकाराला सामाजिक न्याय व्यवस्थेचा अवमान व लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचे नमूद करत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात तात्काळ निषेध नोंदवून जाहीर माफी, प्रशासकीय चौकशी व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालय स्तरावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सदर निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते सुनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष गौतम चित्ते यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी तालुका उपाध्यक्ष विशाल पठारे, महासचिव ॲड. अण्णासाहेब मोहन, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, प्रकाश सावंत, सरचिटणीस संतोष बनसोडे यांच्यासह संजय महाले, संतोष त्रिभुवन, सुशील पठारे, तन्वीर मुबारक शेख, किरण झालटे, सिद्धार्थ धनेधर, मनोज शिंदे, सी. एस. बनकर, सलीम शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही. बाबासाहेबांचा अवमान म्हणजे देशाच्या आत्म्याचा अपमान आहे,” अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.




