पुणे निगडी:-पीएमपीएमएल’चे दुसरे नाव मृत्यूदेवता.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
‘पीएमपीएमएल’चे
दुसरे नाव मृत्यूदेवता
निगडी, दि. 02 (शफिक शेख):- पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या वाहतूक सोयीसाठी आणि आधुनिकतेचे एक पाउल म्हणून पीएमपीएमएलची स्थापना करण्यात आली होती. परंतु हीच पीएमपीएमल आता नागरिकांसाठी मृत्यूदेवता ठरत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणून भक्ती शक्ती येथील अण्णाभाउ साठे बस टर्मिनल येथे बस क्रमांक एम एच 14 एच यू 6294 (अॅन्थोनी 73) या बसने धडक देवून सोनिया गयाप्रसाद यादव या 60 वर्षीय महिलेचा जीव घेतला. याबाबत मयत सोनिया यादव यांचे पुत्र संजय गयाप्रसाद यादव वय 35 वर्षे यांनी निगडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून भा. द. वि. कलम 279, 338, 304(क) मोटार वाहन कायदा कलम 1884, 119 आणि 177 प्रमाणे गुन्हा दाखल करून बस चालक भिमराव रघुनाथ पवार यास अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण हे पुढील तपास करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोनिया यादव या भक्ती शक्ती चौक येथे बसमधून उतरून आपल्या आशिर्वाद कॉलनी येथील घराकडे जात असताना बस क्रमांक एम एच 14 एच यू 6294 वरील चालक भिमराव रघुनाथ पवार या 32 वर्षिय चालकाने त्याच्या ताब्यातील बस हयगयीने आणि भरधाव वेगाने चालवत फिर्यादी संजय यादव यांच्या आईस पाठीमागून जोरात धडक दिली त्यामुळे त्यांच्या डोक्यास जबर मार लागून त्या अतिशय गंभिररित्या जखमी झाल्या. तेथून त्यांना वायसीएम रूग्णालय येथे उपचारासाठी घेवून गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सदर अपघाताची माहिती मिळताच विश्वजीत खुळे पोलीस निरीक्षक गुन्हे निगडी, विजयकुमार धुमाळ सपोनि निगडी पो. स्टे., जीवन म्हस्के पोलीस उपनिरीक्षक, नाथा केकाण पोलीस उपनिरीक्षक निगडी पोलीस स्टेशन यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आवश्यक त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अॅम्ब्यूलन्स बोलवून सोनिया यादव यांना वायसीएम रूग्णालयाकडे रवाना केले. यापुढे तपास अधिकारी नाथा केकाण यांनी कार्यवाही करीत आरोपी ड्रायव्हर भिमराव पवार यास ताब्यात घेतले.
अत्यंत धोकादायक उतार असलेले बस टर्मिनलमधील वळण
या बस टर्मिनलची पाहणी केली असता येथील लेन नंबर 4 मधून आलेल्या बसेस वळण घेण्यासाठी अत्यंत वेगाने आणि धोकादायक पद्धतीने वळण घेतात ज्यामुळे त्यांना बसवर नियंत्रणही राखता येत नाही. येथील वळणावरील उतार अत्यंत धोकादायक, खोल आणि नादुरूस्त अशा प्रकारचा आहे. अनेकवेळा नागरिकांनी मागणी करूनही या टर्मिनलमधील रस्त्यांची आणि वळणाची दुरूस्ती केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आणखी किती जीव गेल्यानंतर पीएमपीएमएल प्रशासन याची दखल घेणार आहे, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. या टर्मिनलमधून बाहेर पडणा-या बसेस या परवानगी नसलेल्या जागेतूनच बसेस बाहेर काढतात ज्यामुळे अपघाताचा धोका अधिक जास्त होतो.
….तर ‘पीएमपीएमएल’वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येईल का?
बस टर्मिनलमधील नादुरूस्त रस्ते आणि धोकादायक वळणे, बस चालकांची अकार्यक्षमता असणे, वाहतूक नियमांचे पालन न करता बस आपल्या मर्जीप्रमाणे बस चालविणे, ठेकेदारांनी बस चालकांची नियुक्ती करताना पुरेशी माहिती आणि काळजी न घेणे या सर्व कारणांमुळे जर नागरिकांचा जीव जात असेल तर त्या कारणासाठी पीएमपीएमएल ही सदोष मनुष्यवधाच्या गुन्हयासाठी पात्र ठरत नाही का, असाही प्रश्न यावेळी नागरिकांनी विचारत आपला रोष व्यक्त केला.
मयत सोनिया यादव यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा – सचिन चिखले
यावेळी पीएमपीएमएलच्या चुकीमुळे जीव गमवावा लागलेल्या सोनिया यादव यांच्या कुटुंबियांना संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी केली. तसेच या बस टर्मिनलमध्ये सुरक्षिततेच्यादृष्टीने जी अंमलबजावणी करण्याची गरज आहे ती पीएमपीएमएलने करावी जेणेकरून भविष्यात आणखी कोणा नागरिकाचा जीव जाता काम नये, असेही चिखले यांनी यावेळी सांगितले.