वाईत मद्यपींची खैर नाही! पोलिसांचा दणका; सात गुन्हे दाखल, धिंगाणेबाजांचे धाबे दणाणले!
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाईत मद्यपींची खैर नाही! पोलिसांचा दणका; सात गुन्हे दाखल, धिंगाणेबाजांचे धाबे दणाणले!

गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड अन् स्मशानभूमी परिसरात छापासत्र; सार्वजनिक ठिकाणी उच्छाद मांडणाऱ्यांना पोलिसांचा कडक इशारा!
सातारा | वाई, दि. २८ : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धिंगाणा घालायचा, नागरिकांना शिवीगाळ करायची आणि परिसरातील शांतता भंग करायची, अशा प्रवृत्तींना आता वाई पोलिसांनी थेट कारवाईचा दणका दिला आहे! शहरातील गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोडसह विविध स्मशानभूमी परिसरांत पोलिसांनी छापे टाकत मद्यपींविरुद्ध धडक मोहीम राबवली. या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गैरवर्तन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाई शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणे, शिवीगाळ करणे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी शहरातील विविध ठिकाणी विशेष पथकांनी छापे टाकून कारवाई केली. मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
घाट, रस्ते अन् स्मशानभूमी परिसर पोलिसांच्या रडारवर!
गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड आणि स्मशानभूमी परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरवर्तनाविरुद्ध कठोर भूमिका घेतली. सार्वजनिक ठिकाणे ही नागरिकांच्या वापरासाठी असून, तेथे मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांना मोकळे रान दिले जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
पोलिसांचा स्पष्ट इशारा; नियम मोडाल तर कारवाईला सामोरे जा!
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणे, धूम्रपान करणे तसेच मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस कर्मचारी विक्रम धोत्रे, धीरज भोसले, हेमंत शिंदे, सोमनाथ टिके, रुपेश जाधव, गोरख दाभाडे आणि महिला पोलीस कर्मचारी पूजा गोळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
वाई शहरातील सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी उगारलेला हा कारवाईचा बडगा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक ठिकाणांची शिस्त राखण्यासाठी पोलिसांची ही मोहीम गैरवर्तन करणाऱ्यांना ठोस इशारा देणारी ठरली आहे.
2) वाई:-मतपेटीत पदवीधरांचा कौल, वाईत राष्ट्रवादीचा गुलाल! हर्षदा देशमुख जाधव यांच्या विजयाने कार्यकर्त्यांचा जल्लोष.

किसनवीर चौकात फटाक्यांचा धडाका, गुलालाची उधळण अन् पेढे भरवून आनंदोत्सव; ९,७०० मतांनी विजयाची चर्चा.
सातारा | वाई, दि. २९ : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा देशमुख जाधव यांनी ९ हजार ७०० मतांच्या फरकाने विजय मिळवल्याच्या वृत्ताने वाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी किसनवीर चौकात एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी केली.
किसनवीर चौकात विजयाचा जल्लोष!
विजयाचे वृत्त समजताच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी किसनवीर चौकात गर्दी केली. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमला, तर गुलालाची उधळण आणि घोषणाबाजीने उत्सवाला रंग चढला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या जल्लोषात सहभाग घेतला.
पदवीधरांच्या प्रश्नांवर अपेक्षा
हर्षदा देशमुख जाधव यांना १ लाख १३ हजार ९५ मते मिळाल्याचे सांगण्यात आले. पदवीधरांचे प्रश्न, रोजगाराच्या संधी, शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि उच्चशिक्षित तरुणांच्या समस्या यांसारख्या मुद्द्यांवर आगामी काळात प्रभावीपणे काम होईल, अशी अपेक्षा समर्थकांनी व्यक्त केली.
संघटनात्मक ताकदीचा उत्सव
या निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेला प्रचार, मतदारांशी साधलेला संपर्क आणि संघटनात्मक प्रयत्न यांचा विजयात वाटा असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. हर्षदा देशमुख जाधव यांच्या विजयाच्या निमित्ताने वाईतील उत्स्फूर्त जल्लोषातून कार्यकर्त्यांचा आनंद दिसून आला.
आता पदवीधरांचे प्रश्न विधानमंडळात किती प्रभावीपणे मांडले जातात आणि तरुणांच्या अपेक्षांना कितपत न्याय मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
3) वाई:-वाढदिवसाचा गाजावाजा टाळला, रुग्णसेवेचा ध्यास जपला! मकरंद आबांच्या आवाहनाला वाईत कृतीतून प्रतिसाद.

वाई ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी.

सातारा | वाई, दि. २९ : वाढदिवसाचा थाटमाट नको, सत्कार-हारतुरे नकोत; त्याऐवजी गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान फुलवा! राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या या संवेदनशील आवाहनाला वाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृतीतून प्रतिसाद दिला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत वाई ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांनी सेवाभावाचा आदर्श घालून दिला.
लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृती आणि नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या व्यथा लक्षात घेऊन ना. मकरंद आबा पाटील यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. शुभेच्छांच्या निमित्ताने सत्कार, हारतुरे आणि अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, गरजूंना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते व हितचिंतकांना केले होते. त्यांच्या या भूमिकेचा आदर करत वाई तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रुग्णसेवेला प्राधान्य दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई तालुकाध्यक्ष तथा किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, पंचायत समिती सभापती पै. विक्रांत डोंगरे आणि माजी नगरसेवक चरण गायकवाड यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंसोबत वाटून घेण्याचा संवेदनशील संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
राज्यातील नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक विविध अडचणींचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत वैयक्तिक आनंदोत्सवापेक्षा संकटग्रस्तांच्या दुःखात सहभागी होणे, गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे आणि समाजाप्रती आपले कर्तव्य निभावणे अधिक महत्त्वाचे आहे. ना. मकरंद आबा पाटील यांच्या आवाहनामागील हाच विचार वाईतील कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई तालुकाध्यक्ष तथा किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, पंचायत समिती सभापती पै. विक्रांत डोंगरे, माजी नगरसेवक चरण गायकवाड, पोपट जगताप, महेंद्र पुजारी, प्रमोद वारागडे, महादेव वाडकर, नाना चिकणे, यश गाढवे, संदीप खोपडे, सागर बाबर, रवी जाधव, उमेश भिसे, कृष्णदेव वाडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौरभ निंबाळकर, डॉ. खान, डॉ. कोमडे तसेच रुग्णालयातील कर्मचारी आणि परिचारिकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
वाढदिवसाचा जल्लोष टाळून सेवेला प्राधान्य, हीच खरी सामाजिक बांधिलकी! अजितदादांच्या लोकसेवेचा विचार आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्याची परंपरा पुढे नेण्याचा संदेश देणारा वाईतील हा उपक्रम मकरंद आबांच्या आवाहनाला मिळालेला संवेदनशील प्रतिसाद ठरला.




