वाई:-खाकीचा मानवतेला सलाम! वाई पोलीस ठाण्यात रक्तदानाचा महायज्ञ; ६५ रक्तदात्यांनी दिले जीवनदान पोलीस-जनतेच्या सहभागातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

खाकीचा मानवतेला सलाम! वाई पोलीस ठाण्यात रक्तदानाचा महायज्ञ; ६५ रक्तदात्यांनी दिले जीवनदान पोलीस-जनतेच्या सहभागातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श.

वाई |प्रतिनिधी
वाई दि.१६:जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधत वाई पोलीस ठाणे आणि अक्षय ब्लड बँक, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ६५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या जबाबदारीसोबतच समाजहिताच्या कार्यातही पोलीस दल नेहमीच अग्रेसर असते, याची प्रचिती या उपक्रमातून आली. वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती झाली.
या शिबिरात सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक वाळुंज यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि शहरातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. रक्तदानासाठी आलेल्या प्रत्येक दात्यामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात अक्षय ब्लड बँकेच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने अत्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने रक्त संकलन केले. संकलित झालेले रक्त विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या आणि आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज असलेल्या अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे.
वाई पोलीस ठाण्याने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पोलीस आणि जनतेमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यास अशा उपक्रमांची निश्चितच मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




