जावळी:-करहर नूतन पुलावर दुचाकी अपघातानंतर लावले बॅरीगेट.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

करहर नूतन पुलावर दुचाकी अपघातानंतर लावले बॅरीगेट.

करहर दि: सध्या जावळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दळणवळणाचे साधन उपलब्ध होत आहे. याचे स्वागत आहे. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विकास नको पण सुरक्षा हवी असं म्हणण्याची पाळी आली आहे. करहर – पाचवड रस्त्यावरील करहर गावच्या नजीक पुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी आधी दुचाकी अपघात त्यानंतरच बॅरीगेट लावण्यात आले आहे. आता याची चौकशी करून कारवाई होणार की तसेच रेटून नेणार ? असा प्रश्न निवडणुकीच्या तोंडावर वारकरी मतदारांना पडला आहे.
जावळी तालुक्यातील प्रति पंढरपूर असा उल्लेख असलेल्या करहर परिसरामध्ये महू – हातगेघर धरणामुळे या मार्गावर वाहतूक वाढली आहे. थंड हवेचे ठिकाण पाचगणी जवळ असल्यामुळे पर्यटकांना सुद्धा याच रस्त्याचा वापर करणे सोयीचे झाले आहे. सध्या या ठिकाणी एका पुलाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला असून कोणत्याही प्रकारचे सुरक्षा बॅरीगेट व फलक नसल्यामुळे काल सायंकाळी एक दुचाकी थेट नवीन काम सुरू असलेल्या पूल भिंतीवरून खाली कोसळून पडली. सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी ठेकेदाराचा दुष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. हे स्पष्ट दिसत आहे . तरी ही अनेक जण गप्प बसून आहेत.
जावळी तालुक्यात विकास कामे करताना काही ठिकाणी जाणीवपूर्वक निकृष्टदर्जा आणि निष्काळजीपणा याची अभेद युती झाली आहे. त्यामुळे सामान्य जावळीकर परिघाबाहेर फेकला गेला आहे.
विकास कामांना मंजुरी आणण्यासाठी लोकप्रतिनिधी धडपड करतात आणि त्यावर ताव मारण्यासाठी ठेकेदारीचे काही लगडबघे टपून बसलेले असतात. याची प्रचिती अलीकडच्या काळात सर्वांनाच येऊ लागलेली आहे. त्यामुळे वाटेकरांचीही संख्या वाढली आहे. यामध्ये सत्ताधारी व विरोधक सुद्धा एकत्र आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागात असं काम घेणारे व विकणाऱ्या टोळीच्या मुकादमचा कार्यालयात आठवड्याचा बाजार भरत असतो. पण, निकृष्ट दर्जा व निष्काळजीपणा बाबत नियमानुसार तपासणी करून कारवाई झाल्याचे कधीही दिसून आलेले नाही. हीच खरी लोकशाहीची चेष्टा झालेली आहे.
आता सातारा जिल्हा परिषद व जावळी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये किमान वाहन चालकांनी तरी या गोष्टीकडे लक्ष देऊन जागरूकतेने मतदान करावे. असे वारकरी संप्रदायातील लोकांनी हात जोडून विनंती केली आहे.
करहर पुलावर दुचाकी स्वार जखमी झाला असला त्याची विचारपूस करण्यासाठी ना ठेकेदार गेले. ना राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पायाची धूळ त्याच्या घराला लावली. मग नेमका विकास कुणासाठी ?असाही प्रश्न स्थानिकांना पडला आहे. माहितीच्या अधिकारात अर्ज करून त्यातून जावळीत मलिदा गँग रोजीरोटी चालवत असली तरी सामान्य माणसांच्या त्रासाबाबतही ते मूग घेऊन गप्प का आहेत? याची माहिती जनतेला झालेली आहे. त्यामुळे प्रामाणिकपणाने माहितीचा अधिकार वापरणाऱ्या कार्यकर्त्यांनीच अशा प्रवृत्तीला आळा घालावा. अशी मागणी पुढे आलेली आहे. दरम्यान, करहर नवीन पुलाच्या दुचाकी अपघातानंतर त्या ठिकाणी बॅरीगेट लावण्यात आले असले तरी कामांमुळे धूळ लोकांच्या नाकात तोंडात जाऊन श्वसननलिका
त्रास सुरू झालेले आहेत. या ठिकाणी रस्त्यावर पाणी मारल्यास धुळ उडणार नाही. ये साधे गणित आहे. हे संबंधित ठेकेदाराने समजून घ्यावे. कारण, सध्या लोकशाही पेक्षा ठेकेदारशाही हेच लोकशाही चालवत आहेत . हे तण ग्रामीण भागातही वाढले आहे. त्यांनी विकास कामाच्या नगदी पिकाचे तरी नुकसान करू नये. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




