अहिल्यानगर:-पारनेरमध्ये गरीबांच्या ताटात सडके धान्य; ३ वर्षांपासून दक्षता समितीच नाही, तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अहिल्यानगर:-पारनेरमध्ये गरीबांच्या ताटात सडके धान्य; ३ वर्षांपासून दक्षता समितीच नाही, तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली.

मनसेचा गंभीर आरोप – मनसे आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी, २ दिवसात कारवाई नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन.
पारनेर (राजकुमार इकडे) – पारनेर तालुक्यातील शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाळ्या लागलेला तांदूळ व सोंडे (किडे) लागलेला गहू वाटप सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे तहसीलदार पारनेर यांनी दि. २२ व २३ ऑक्टोबर रोजी आदेश देऊनही हे वाटप थांबलेले नाही.
या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी तहसीलदारांना निवेदन देऊनही दि. २४ ऑक्टोबरपर्यंत एकाही दुकानातील धान्य बदलले नाही. तहसीलदारांनी स्वतः पत्र क्र. १४६/२०२६ आणि १५१/२०२६ अन्वये पंचनामा करून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना कळवल्याचे मान्य केले आहे.
*सर्वात धक्कादायक बाब -* पारनेर तालुक्यात गेल्या ३ वर्षांपासून तालुका दक्षता समिती (Vigilance Committee) स्थापनच केलेली नाही. शासन नियमानुसार आमदार अध्यक्ष व तहसीलदार सचिव असलेली ही समिती दर ३ महिन्यांनी रेशन दुकाने व गोदामांची तपासणी करणे बंधनकारक असते. समितीच नसल्याने गेली ३ वर्षे कोणतीही तपासणी झाली नाही आणि याचाच फायदा घेऊन सडके धान्य वाटप केले जात आहे. हा संगनमताने केलेला भ्रष्टाचार असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
*मनसेच्या मागण्या -*
१) खराब धान्याचे नमुने जप्त करून लॅब रिपोर्ट जाहीर करावा.
२) सर्व लाभार्थ्यांना तात्काळ चांगले धान्य द्यावे.
३) गोदाम व्यवस्थापक व पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करावे.
४) ८ दिवसात नवीन दक्षता समिती स्थापन करून त्यात मनसे व सामाजिक संघटनांना स्थान द्यावे.
२ दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ डफळ, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष अविनाश पवार , सुपा शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, पारनेर शहराध्यक्ष सतीश म्हस्के, सुरज गोरे, मंगेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




