श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावांतील आकारीपडीत शेतकऱ्यांचे अन्नत्याग उपोषण सुरू.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावांतील आकारीपडीत शेतकऱ्यांचे अन्नत्याग उपोषण सुरू.
“हक्काच्या जमिनीसाठी शेतकरी रस्त्यावर! ९ गावांतून ट्रॅक्टर रॅली; शेती महामंडळ कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणाचा एल्गार”

श्रीरामपूर / माळेवाडी (RPS स्टार न्यूज प्रतिनिधी) :
श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावांतील आकारीपडीत शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात, तसेच शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी त्यांच्या नावावर कायदेशीररित्या करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी आकारीपडीत शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शेतकऱ्यांनी भव्य ट्रॅक्टर रॅली काढून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
ही ट्रॅक्टर रॅली हरेगाव फाटा येथून सुरू झाली. त्यानंतर रॅली गांधी पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आंदोलक शेतकरी पुन्हा हरेगाव येथे दाखल झाले.
हरेगाव येथील शेती महामंडळ कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे. आकारीपडीत जमिनी तात्काळ शेतकऱ्यांना परत मिळाव्यात आणि शेतकऱ्यांच्या हक्काची जमीन त्यांना मिळावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करून या जमिनीबाबत कायदेशीर व न्याय्य निर्णय घ्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व अॅड. अजित काळे करीत असून, ९ गावांतील आकारीपडीत शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
“जमीन आमच्या हक्काची; निर्णयही आमच्या न्यायाचा!” असा निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात आपला लढा तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.




